जळगाव जामोद (प्रतिनिधी):
शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'शिवभोजन' योजनेचा मूळ उद्देश गरजू आणि मजुरांना स्वस्त दरात जेवण देणे हा आहे. मात्र, जळगाव जामोद येथील शिवभोजन केंद्र या उद्देशाला हरताळ फासत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधले आहे: त्यामध्ये केंद्रावर दररोज जेवण घेणारे लाभार्थी हे ठराविक व्यक्तीच असल्याचे दिसून येते. केवळ कागदोपत्री आकडेवारी पूर्ण करण्यासाठी विशिष्ट नावांचा वापर केला जात असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.शासकीय नियमानुसार शिवभोजन केंद्र हे बस स्थानक, जिल्हा रुग्णालय किंवा गजबजलेल्या ठिकाणी असणे अनिवार्य आहे. मात्र, हे केंद्र गावाबाहेरील एका खाजगी बस स्टँडवर असल्याने सामान्य प्रवाशांना याचा लाभ मिळत नाही.केंद्राच्या परिसरात मद्यपींचा मोठा वावर असतो, त्यामुळे महिला आणि विद्यार्थी या केंद्रावर जाण्यास धजावत नाहीत. महिला लाभार्थ्यांची संख्या नगण्य असण्यामागे हेच मुख्य कारण असल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्थानिक समितीने या केंद्राची नियमित पाहणी करणे आवश्यक असताना, आजवर या त्रुटी का समोर आल्या नाहीत? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.या निवेदनाद्वारे संबंधित शिवभोजन केंद्राची सखोल चौकशी करून केंद्र चालकाचा परवाना तात्काळ रद्द करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली आहे. तसेच, हे केंद्र योग्य ठिकाणी स्थलांतरित करून गरजूंपर्यंत लाभ पोहोचवावा, अशी विनंती ज्ञानेश्वर पारस्कर,परिक्षित ठाकरे, भागवत पाटील,शिवचरण पवार, देविदास घाईट, शिवचरण खोंड, राजेंद्र हुरसाळ, निलेश पैसोडे, ऋषिकेश देशमुख, सचिन हुरसाळ, श्रीकांत झाटे, महेश पारस्कार, ऋषिकेश पारस्कार, राहुल पारस्कार यांच्यासह अनेक नागरिकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठवण्यात आले आहेत.
