राजु भास्करे/अमरावती...
मेळघाट परिसरातील आदिवासी मजुरांच्या मनरेगा योजनेअंतर्गत थकीत असलेल्या मजुरीच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे. पत्रकार नितीन वारखडे व इंजि. अक्षय अथोटे यांनी मेळघाट येथील मजुरांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद अमरावतीच्या मनरेगा विभागात भेट देत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी मनरेगा विभागाच्या बीडीओ श्रीमती मीना म्हसडकर यांनी मजुरांना दिलासा देणारी माहिती दिली. “होळीपूर्वी थकीत मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच रक्कम हस्तांतरित होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.मेळघाट हा आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग असून येथील अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे प्रमुख साधन म्हणजे मनरेगा योजना आहे. गेल्या काही महिन्यांपासून मजुरी थकीत राहिल्याने मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. होळीचा सण जवळ आल्याने आर्थिक अडचणी अधिकच तीव्र झाल्या होत्या. सणासुदीच्या काळात घरखर्च भागवण्यासाठी थकीत मजुरी मिळणे अत्यावश्यक असल्याने मजुरांमध्ये चिंता वाढली होती.पत्रकार नितीन वारखडे आणि इंजि. अक्षय अथोटे यांनी ग्रामस्थ व मजुरांशी संवाद साधून हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरल्यास मेळघाटातील हजारो आदिवासी मजुरांना होळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होईपर्यंत मजुरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागून राहणार आहे.
