कार्यकर्त्याच्या निधनानंतर दोन मुलींचे पालकत्व स्वीकारून आ. संजय कुटे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी...


 कार्यकर्त्याच्या निधनानंतर दोन मुलींचे पालकत्व स्वीकारून आ. संजय कुटे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील निधन पावलेले कार्यकर्ते दिलीपराव काळमेघ यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब पोरके झाले, तर दोन मुकबधिर मुलींच्या डोक्यावरचे पितृत्व हरपले. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजयजी कुटे. त्यांनी कु. पल्लवी आणि गौरी या दोन्ही मुलींची जबाबदारी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे स्वीकारत त्यांच्या आयुष्याला आधार दिला.भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून परिवार आहे, असे अनेकदा म्हटले जाते. या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवत ‘संजूभाऊंनी’ त्या दोन मुकबधिर मुलींचे शिक्षण, संगोपन आणि भविष्याची जबाबदारी स्वीकारली. मोठी मुलगी पल्लवी हिच्या विवाहाचा प्रश्न पुढे आला तेव्हा त्यांनी पुढाकार घेतला. योग्य वर शोधण्यापासून ते स्वतः मुलगा पाहण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते उपस्थित राहिले. बेलखेड येथील मनोराव धुमाळे यांचे चिरंजीव विठ्ठल यांना पाहण्यासाठी ते स्वतः गेले. पल्लवी आणि तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आज सुरक्षिततेचा भाव आहे — आपल्या हक्काचा माणूस आपल्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसतो.

आमदार कुटे यांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर ते पाळून दाखवले. अधिकाराने बोलणारे नेते अनेक असतात; पण कार्यकर्त्याच्या कुटुंबाला स्वतःच्या कुटुंबाचा दर्जा देऊन मुलींचे कन्यादान करण्याची तयारी दाखवणारे नेतृत्व विरळच. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे नेतृत्व कसे असावे, याचे जिवंत उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून ‘कर्मयोद्धा’ म्हणून गौरव होत असून त्यांच्या या संवेदनशीलतेला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.

Previous Post Next Post