जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जामोद येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा व विचारांचा परिचय करून देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली असून, संघाला जवळपास शताब्दीचा इतिहास लाभला आहे. या कालखंडात संघटनात्मक कार्य, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून संघाने विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले.संघाची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगताना शाखा ही संघाची मूलभूत रचना असल्यावर भर देण्यात आला. शाखेतील शारीरिक, बौद्धिक आणि सांघिक उपक्रमांद्वारे स्वयंसेवकांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे स्पष्ट करण्यात आले.
संघाच्या विचारांचा विस्तार भारतापुरता मर्यादित नसून विविध देशांत शाखा व कार्य उपक्रम चालतात. “वसुधैव कुटुंबकम” या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित विश्वकल्याणाची भावना संघाच्या प्रार्थनेतून व्यक्त होते, असे सांगण्यात आले. स्वयंसेवकांच्या माध्यमातून देशभरात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आदी क्षेत्रांत विविध सेवा प्रकल्प राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत सेवा उपक्रम पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
संघाच्या विचारसरणीत सांस्कृतिक ओळख, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता यांवर विशेष भर दिला जातो. समाजपरिवर्तनासाठी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेचे महत्त्व प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार यांनी आपल्या उद्बोधनात स्पष्ट केले.या कार्यक्रमात आशीर्वचनासाठी श्रद्धा आश्रम, टुनकी येथील श्री श्री १००८ स्वामी गोविंदगिरी महाराज उपस्थित राहिले. प्रमुख वक्ते म्हणून दीपकजी तामशेट्टीवार (प्रांत संघचालक, विदर्भ प्रांत) यांचे विशेष व्याख्यान झाले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ. पंचफुलाताई वंडाळे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राठी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन हागे यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत जनता विद्यालय येथील जना मुक्ताई यांच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजनाने झाली. संगीतामय सुंदरकांड सत्संग मंडळ, जामोद यांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. भारत मातेच्या आरतीने हिंदू संमेलनाची सांगता करण्यात आली.
