जळगाव जामोद (प्रतिनिधी):
तालुक्यातील सुनगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाने डोकं वर काढलं असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील श्री आवजीसिध्द बँकेजवळील नळांना चक्क दुषित आणि फेसयुक्त पाणी येत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक ग्रामस्थ आनंद धुळे यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून सुनगाव मधील श्री आवजीसिध्द बँकेजवळील परिसरात नळावाटे येणारे पाणी अत्यंत दूषित आणि फेसाळलेले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून, वापरासाठी देखील घातक असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे परिसरात विषबाधा किंवा साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
_____________________
"ग्रामपंचायत प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे. वारंवार तक्रार करूनही दूषित पाण्याचा पुरवठा थांबलेला नाही. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही."
— आनंद धुळे, ग्रामस्थ, सुनगाव.
_____________________
आनंद धुळे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:तातडीने शोध घ्या: नळामध्ये दूषित आणि फेसाळलेले पाणी नेमके कोठून मिसळत आहे, याचा शोध युद्धपातळीवर घ्यावा.शुद्ध पाणीपुरवठा: तात्काळ उपाययोजना करून ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.या हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत अधिकारी हितेंद्र जोशी तसेच जळगाव जामोदचे गटविकास अधिकारी (BDO) संदीप मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.जर येत्या काही दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही आणि दूषित पाण्याचा स्रोत बंद केला नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आनंद धुळे यांनी दिला आहे. यामुळे आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
