चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा'चा समारोप नेत्र तपसणी आणि मोफत चष्मा वाटपाने..हजारो नागरिकांनी घेतला उपचारांचा लाभ...


 चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य मेळावा'चा समारोप नेत्र तपसणी आणि मोफत चष्मा वाटपाने..हजारो नागरिकांनी घेतला  उपचारांचा लाभ...

शेगाव/बुलढाणा:

बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य चार दिवसीय 'राष्ट्रीय आरोग्य  मेळावा २०२६' आज नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटपाने यशस्वी समारोप झाला. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.समारोप प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकून आयुष मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या आपल्या भारतीय उपचार पद्धती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. या शिबिराच्या माध्यमातून  जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे मोठे समाधान आहे.

​ केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोठ्या उत्सवात झाले. या आरोग्य मेळाव्यात चार दिवसांत सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधींचा लाभ घेतला.तसेच  देशभरातून आलेल्या १५ हून अधिक आयुर्वेद आणि योग तज्ज्ञांनी नवीन डॉक्टरांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ​कार्यक्रमादरम्यान केवळ उपचारच नाही, तर जनजागृतीवरही भर देण्यात आला. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी ९ नामांकित औषधी कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांशी (FPOs) खरेदी करार (MoUs) केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४ हजार आशा स्वयंसेविकांना 'आजीबाईचा बटवा' हे पुस्तक देऊन घरगुती पारंपरिक उपचारांचा प्रसार घराघरापर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले. ​शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सुमारे २,७५० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेली कृत्रिम अवयवे, बॅटरीवर चालणाऱ्या सायकली व इतर साहित्याचे मोजमाप घेण्यात आले असून, एका महिन्यात त्याचे वाटप केले जाणार आहे. आज शेवटच्या दिवशी १० हजार मोफत चष्म्यांचे वाटप करून नेत्ररुग्णांना दिलासा देण्यात आला.

Previous Post Next Post