डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत जळगाव जामोदच्या शर्विल भगतचे उत्तुंग यश;


 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत जळगाव जामोदच्या शर्विल भगतचे उत्तुंग यश;

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ (GVST Association) यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक' स्पर्धेत जळगाव जामोद येथील 'दि न्यू इरा हायस्कूल'चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी शर्विल अनिल भगत याने घवघवीत यश संपादन केले आहे. शर्विलने या स्पर्धेच्या अत्यंत कठीण अशा शेवटच्या फेरीत मजल मारली असून, संपूर्ण तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून इयत्ता सहावीच्या सुमारे १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ ४२९ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडक विद्यार्थ्यांमध्ये शर्विलने आपले स्थान निश्चित करून जळगाव जामोदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.अंतिम फेरीसाठी शर्विलने 'कम्पॅरिझन बिटवीन केमिकल अँड ऑरगॅनिक फार्मिंग'(रासायनिक आणि सेंद्रिय शेतीची तुलना) हा महत्त्वपूर्ण विषय निवडला आहे. या शोधनिबंधासाठी तो स्वतःशेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, त्यांच्या अनुभवातून:शेतीचा खर्च आणि फायदा.उत्पादनाचा वेग आणि जमिनीचा पोत.बाजारपेठेतील मागणी आणि आव्हाने.या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून इंग्रजी माध्यमातून आपला शोधनिबंध सादर करणार आहे.येत्या १५ मार्च रोजी मुंबई येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. यामध्ये शोधनिबंध सादरीकरण आणि दोन टप्प्यांतील मुलाखतींचा समावेश असेल. विशेष म्हणजे, 'दि न्यू इरा हायस्कूल'च्या इतिहासात या परीक्षेच्या मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारा शर्विल हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.शर्विलच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post Next Post