अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शेगाव शहरात झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोने, हुंदाई कार आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, अकोला जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांची देखील उकल करण्यात आली आहे.दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव येथील माउली नगर भागात राहणारे धीरजकुमार रामपाल सिंग यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कडीकोंडा तोडून प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि हुंदाई कार लंपास केली होती. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या गुन्ह्याच्या समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यामध्ये १) राजेंद्र बाबासाहेब राऊत (वय २५ वर्ष, रा. सेलुरोड परतूर, जि. जालना)२) राजेश शंकर शर्मा (वय ३० वर्ष, रा. मनमाड, जि. नाशिक)३) श्रीराम सोमनाथ सोनवणे (वय २० वर्ष, रा. जातेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असून पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे ब्रेसलेट व टॉप्स (१६ ग्रॅम) – किंमत ६५,०००/- रुपये.हुंदाई कार (MH-49-CS-4956) – किंमत ६,००,०००/- रुपये.तीन मोबाईल संच – किंमत २१,०००/- रुपये.एकूण किंमत: ६,८६,०००/- रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे.तपासणीत असे समोर आले की, आरोपी राजेंद्र राऊत याच्यावर १७ गुन्हे, राजेश शर्मा याच्यावर २७ गुन्हे, तर श्रीराम सोनवणे याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. या अटकेमुळे अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड आणि खदान पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पीएसआय यशोदा कानसे, अविनाश जायभाये व पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
