बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
बुलढाणा जिल्हा येथील लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाला सरपंचांनी हिंसक व अमानुष वळण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सरपंचांनी गावातील महिलांवर अत्याचार करत निर्घृण मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, महिलांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची माहिती आहे.या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, या अन्यायाविरोधात आज नांदुरा तालुका येथे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. संबंधित सरपंचावर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा पाटील युवक समिती, जिजाऊ ब्रिगेड तसेच समस्त हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.या संदर्भात नांदुरा तहसील कार्यालयात माननीय तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट व कडक इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
