जळगाव (जामोद) प्रतिनिधी: दि.१५
महिलांसाठी महिला दिनाचे महत्त्व आहे. महिला आपल्या कर्तुत्वाने फार पुढे गेलेल्या आहेत. नारीशक्ती ही फार महत्त्वाची आहे. आपले घर हे सर्वांग सुंदर प्रसन्न ठेवून आपल्या घराला स्वर्गासम सुंदर ही नारीच बनवू शकते असे प्रतिपादन राजयोगिनी शशी दीदी यांनी केले. स्थानिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महिला दिनाच्या त्यावर दिनांक ८ मार्च रोजी आयोजित महिला गौरव कार्यक्रमात्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अजय टापरे स्मृती आदिवासी आश्रम शाळेच्या स्नेहाताई टापरे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल, प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. कविताताई गोमासे, माजी नगराध्यक्ष सौ.मीनाताई सातव , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कसूरकार,शोभाताई गोमासे, रोठे सर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात महिलांभोवती फार व्याप वाढत आहे. त्यांनी आपली नोकरी, दैनंदिन कामे ह्या बरोबरच आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे व संतुलित निरोगी जीवन जगावे, असे आवाहन यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. कविताताई गोमासे यांनी केले. महिला आणि कन्यांनी आपली संस्कृती जतन करून आपली केशभूषा आणि चारित्र्य याकडे कायम लक्ष द्यावे. महिलांनी सतत समाजाप्रती जागृत असावे असे माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल यांनी सांगितले. आपला घर संसार व्यवस्थितपणे सांभाळून सामाजिक सेवा करण्यासाठी सुद्धा गृहिणींनी वेळ काढावा असे मत माजी नगराध्यक्ष मीनाताई सातव यांनी व्यक्त केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष द्यावे. महिलांनी व्यायामाबरोबरच योग अभ्यासाकडे सुद्धा भर द्यावा असे आवाहन योग अभ्यासिका तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कसूरकर मॅडम यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पासून तर विद्यमान राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांचा आदर्श युवतींनी आणि महिलांनी घ्यावा आणि आपले जीवन सार्थकी लावावे असे आवाहन स्नेहा ताई टापरे यांनी केले. उपस्थित मान्यवर महिलांच्या स्वागतानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुमारी वैदेही, साक्षी, वैष्णवी ,पायल ,आरुषी, शितल यांनी आपल्या कलेद्वारे मनमोहक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे शेवटी शिवशक्ती नाट्या मध्ये समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात नारी पुढे आहेत, हे अभिनयातून कुमारी वैष्णवी, माधुरी, साक्षी ,अनुष्का, राधिका, श्रेया ,पायल ,स्नेहा ,कुमारी सातव आणि ब्रह्मकुमारी रेखा दीदी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले. ह्या कार्यक्रमाचे संचालन शोभाताई गोमासे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीती भड मॅडम यांनी केले. शेवटी प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
