राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामली (आर) येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. शिवानी सोळंके हिची गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “विमान वारी” या अभिनव उपक्रमासाठी निवड झाली आहे.जिल्हा परिषद अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजिताजी महापात्र यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विमानप्रवासाचा अनुभव देण्यात येतो.
कु. शिवानी सोळंके हिने यापूर्वी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विज्ञान शिक्षक मनिराम कास्देकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रकाशजी नागले आणि शिक्षकवृंद यांच्या प्रेरणेने तिने हे यश संपादन केले आहे.मेळघाटासारख्या अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थिनीची या उपक्रमासाठी निवड होणे ही परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोदजी खेडकर, गटशिक्षणाधिकारी बी. आर. गिरासे, विस्तार अधिकारी कृष्णकला चुनडे तसेच केंद्रप्रमुख राजीव खोजरे यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या यशामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
_____________________________
“दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास तेही मोठी कामगिरी करू शकतात. कु. शिवानी सोळंके हिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
मनीराम कासदेकर - विज्ञान शिक्षक.
