प्रशांत भोपळे/हिवरखेड (प्रतिनिधी):
महात्मा फुले शिक्षण संस्था, हिवरखेड यांच्या वतीने संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा, हिवरखेड येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी ‘संवाद शालेय अभ्यासिका’ उद्घाटन व शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक संवाद स्नेहमिलन सभेचे भव्य आयोजन करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘संवाद शालेय अभ्यासिका’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा शाळेतील सहकमल सभागृहात या अभ्यासिकेचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे होते, तर अमरावती विभाग शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुनीताताई तळोकार (बकाल), केंद्रप्रमुख सीमाताई टोहरे, संस्थेच्या संचालिका साधनाताई भोपळे, पत्रकार धीरज बजाज, प्रशांत भोपळे,आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.उदघाटनप्रसंगी बोलताना विधान परिषदेचे माजी सदस्य देशपांडे यांनी ‘संवाद अभ्यासिका’ सारखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज व्यक्त केली.सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘शिक्षक संवाद सभा’ पार पडली. या सभेत माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व प्रश्नांवर सकारात्मक आणि उपयोजनात्मक मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट करीत शिक्षकांवरील अन्यायकारक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून त्यासाठी मतदार शिक्षकांनी येणाऱ्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, त्यांना जास्तीत जास्त शिक्षकांनी मतदान करून सभागृहात जाण्याची संधी द्यावी, असे याप्रसंगी आवाहन केले.या कार्यक्रमाला शिक्षक आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गुल्हाने,विवेक देशपांडे, उर्दू शिक्षक आघाडीचे जेष्ठ पदाधिकारी अब्दुल सादिक, तेल्हारा तालुकाध्यक्ष गजानन थारकर, तसेच बाळासाहेब कौसल, संस्थेचे संचालक वीरेंद्र भोपळे, शिवशंकर मार्के, प्रकाश खोब्रागडे, प्रा.कौस्तुभ भोपळे, सुभाष राऊत,पंकज राठी,विजय राठी,नगरसेवक रामेश्वर हागे, कमिलअली मीरसाहेब,संतोष शर्मा, तेल्हारा तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, संचालकगण, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी, सदस्यगण, माजी विद्यार्थी संघ, संवाद सर्वासाठी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, परिसरातील मान्यवर यांच्यासह स्पर्धा परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर अवचार, ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर आदींसह प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून संस्थेचे कार्यवाह, नगरसेवक तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्यामशिल भोपळे यांनी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी उपयोगी व विद्यार्थी हिताय विविध शैक्षणिक उपक्रमांची तसेच सामाजिक उपक्रमांची माहिती व उपयोजन विस्तुतरित्या मांडले. तसेच शिक्षकांच्या समस्येबाबत अकोला जिल्हा संस्थाचालक संघटना व शिक्षक नेत्याच्या माध्यमातून सोडविण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करीत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षक गणेश खानझोडे व सौ. सीमा धुमाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कानुंगा शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सोळंके यांनी केले.संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोपळे कॉलेजचे प्राचार्य संतोषकुमार राऊत, शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
