प्रशांत भोपळे/हिवरखेड(प्रतिनिधी):
वऱ्हाडी बोलीभाषेचे संवर्धन आणि साहित्याचा प्रसार करणाऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, अकोला तर्फे सन २०२५ चे मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये हिवरखेड ता. तेल्हारा येथील शिक्षण तज्ञ डॉ. मयूर लहाने यांना त्यांच्या सामाजिक कार्य आणि 'वाचन चळवळ' क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 'वऱ्हाड रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे.येत्या १२ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी अकोट येथे '७ वे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन' मोठ्या थाटात पार पडणार आहे. 'बोलू वऱ्हाडी, लिहू वऱ्हाडी, जगवू वऱ्हाडी' या ब्रीदवाक्यानुसार आयोजित या संमेलनातच या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.संस्थेच्या वतीने २०२५ सालासाठी विविध क्षेत्रांतील 'रत्नांचा' होणार सन्मान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.डॉ. मयूर लहाने यांनी हिवरखेड आणि परिसरात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 'वऱ्हाड रत्न' पुरस्कार जाहीर झाल्याने, तरुण वर्गात आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.या पुरस्कारांची घोषणा केंद्रीय कार्यकारी समितीच्या वतीने करण्यात आली. यामध्ये श्याम ठक, निलेश कवडे, पुष्पराज गावंडे, रवींद्र दळवी, निलेश देवकर तसेच अनुराधा धामोडे, विद्या राणे, साधना काळबांडे, उषा भोपळे, डॉ. मीना सोसे, शैला चेडे, वैशाली गावंडे आणि उमेश थोरात (इंदूर) यांचा समावेश आहे. सर्व स्तरांतून पुरस्कारार्थींचे अभिनंदन होत असून संमेलनाच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.
