व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस वापरल्यास होणार कडक कारवाई; तहसीलदार पवन पाटील यांचा इशारा...


 व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस वापरल्यास होणार कडक कारवाई; तहसीलदार पवन पाटील यांचा इशारा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी जळगाव जामोद प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. हॉटेल, ढाबे आणि मंगल कार्यालयांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG) वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पवन पाटील यांनी निर्गुमित केले आहेत.

_​प्रशासनाकडून विशेष दक्षता पथकाची स्थापना_

​जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार जळगाव जामोद तालुक्यात 'जिल्हा व तालुकास्तरीय दक्षता पथक' स्थापन करण्यात आले आहे. माननीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली हे पथक आता शहर आणि ग्रामीण भागातील गॅस एजन्सी, पेट्रोल पंप आणि हॉटेल-व्यवसायिकांची अचानक तपासणी करणार आहे.​केंद्र सरकारच्या 'जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ (कलम ३)' आणि 'मेंटेनन्स ऑफ प्रोडक्शन स्टोरेज अँड सप्लाय' ऑर्डरनुसार ही कारवाई केली जाणार आहे. तपासणी दरम्यान खालील गोष्टी आढळल्यास कडक गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामध्ये ​व्यावसायिक ठिकाणी अनधिकृतपणे घरगुती गॅसचा वापर करणे.​पेट्रोल, डिझेल किंवा गॅसची साठेबाजी करणे.वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची अफरातफर किंवा अनियमितता करणे.

________________________

​"तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. ग्राहकांची तक्रार आल्यास संबंधित एजन्सी किंवा व्यावसायिकावर तत्काळ कारवाई केली जाईल."

 > पवन पाटील— तहसीलदार व निरीक्षण अधिकारी (पुरवठा विभाग), जळगाव जामोद

_______________________

​प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन टंचाईच्या अफवांकडे दुर्लक्ष करावे. मात्र, जर कुठेही साठेबाजी किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होताना दिसत असेल, तर प्रशासनाशी संपर्क साधावा.

Previous Post Next Post