जळगाव जामोद(प्रतिनिधी)-
बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला जळगाव जामोद तालुका पूर्वी विकासापासून कोसो दूर होता. येथे उच्च शिक्षणाची अजिबात सोय नव्हती आणि दळणवळणाची साधनेही मर्यादित होती. जळगाव शिक्षण मंडळाने ‘दी न्यू ईरा हायस्कूल’ आणि ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय’ स्थापन करून शिक्षण व्यवस्था सुरु केली होती; तरीही विज्ञान विषयांतून पदवीधर होण्याची संधी मर्यादितच राहिली होती. गेल्या पंचविस वर्षांपासून आमदार डॉ.संजय कुटे हे जळगाव जामोद मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळावा आणि त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी शासकीय आयुर्वैदिक महाविद्यालयाची मान्यता मिळवली आहे. लवकरच सदर महाविद्यालय येथे सुरू होणार आहे.सोबतच जळगाव जामोद मध्ये सुसज्ज केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावही आमदार कुटेंनी शासनाकडे पाठवला असून, हा शाळा देखील लवकरच सुरु होणार आहे. या परिसरातील भिंगारा,चाळीस टापरी,गोमाल या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी भिंगारा येथील उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक इयत्तेत उच्चीत करण्यात आली आहे. यासोबतच,नेताजी सुभाषचंद्र बोस आश्रम शाळेतील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता पन्नास वरून शंभर करण्यात आली आहे. आमदार संजय कुटे यांनी आपल्या मतदार संघाचा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीशील विकास बनावा आणि शैक्षणिक मागासलेपण दूर व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आमदारांनी उत्कर्ष शिक्षण व बहुउद्देशीय संस्था संचालित वै. सत्यभामा अजबराव देशमुख महिला महाविद्यालयाला शासनाकडून मान्यता मिळवून दिली आहे. जळगांव जा. मध्ये लवकरच महाविद्यालय सुरू होऊन तालुक्यातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे स्थानिक महिला विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल आणि मातृशक्तीला बळकटी मिळेल. सदर महिला महाविद्यालयाच्या मान्यतेमुळे जळगाव जामोद मतदार संघातील सर्व सावित्रीच्या लेकींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार असून,या भागातील महिला व विद्यार्थीनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थिनी आमदार डॉ.संजय कुटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मनस्वी अभिनंदन करत आहेत.
