राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अकोला जिल्हा आकोट तालुक्यातील जितापूर या गावातील गजानन सोलकर यांनी संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण योगदान देत सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचे कार्य करत आहेत. ग्रामीण भागात जाऊन त्यांनी युवकांमध्ये धर्मजागृती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सांस्कृतिक अभिमान जागविण्यासाठी सातत्याने व्याख्याने, बैठका व संवाद सत्रे आयोजित केली. असून, अनेक कुटुंबांना पुन्हा आपल्या पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याकरिता त्यांना राज्यस्तरीय *स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.* स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित हा सोहळा ग. दि. माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी, पुणे येथे उत्साहात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता व उपाध्यक्ष रमेश बनगोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. गजानन सोलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हे कार्य कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न आहे. समाजात अज्ञान, भीती आणि आर्थिक प्रलोभने यामुळे मतांतर घडते; त्यासाठी प्रबोधन आणि संवाद हाच उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सावरकरांच्या नावाने मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी पुनर्जन्मासमान आहे. हा पुरस्कार माझ्या कार्यसंघातील सर्व सहकाऱ्यांचा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख अतिथी डॉ. गौतम खट्टर यांनी धर्मरक्षणाबाबत समाज अधिक सजग होण्याची गरज अधोरेखित केली. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच विनायक दामोदर सावरकर यांची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.यंदा राष्ट्रीय पुरस्कार नलगोंडा (तेलंगणा) येथील रामावत नर्यानाईक यांना, तर राज्य पुरस्कार गजानन सोलकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होतेकार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, ग्रंथपूजन व शस्त्रपूजनाने झाली. सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविक केले. शैलेश भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर नारायण देशपांडे यांनी आभार मानले. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी डोंगरे यांच्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.अकोला जिल्ह्यासाठी हा सन्मान अभिमानास्पद ठरला असून, सोलकर यांच्या कार्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रसंगी गजानन सोलकर यांचे परिवार सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

