जळगाव जामोद (प्रतिनिधी):
क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांची जयंती संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने जळगाव जामोद शहरासह ग्रामीण भागातही भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुका निर्विघ्नपणे आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन कुमार पाटील आणि गट विकास अधिकारी (BDO) संदीप कुमार मोरे यांनी नागरिकांना व ग्रामपंचायतींना महत्त्वाचे आवाहन केले आहे.मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामाचे साहित्य, रेती, गिट्टी, विटा तसेच इतर अडथळे पडून असल्याचे निदर्शनास येते. यामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ शकतो, तसेच वाहनांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घरासमोर किंवा मिरवणूक मार्गावर पडलेले बांधकाम साहित्य स्वयंस्फूर्तीने उचलून बाजूला करावे.रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही आणि महामानवांच्या मिरवणुकीला कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकाने 'सामाजिक जबाबदारी' म्हणून घ्यावी. ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे निर्देश गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी दिले आहेत.प्रत्येक गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना मिरवणूक मार्गावरील साहित्य हटवण्याबाबत सूचित करावे.तसेच ग्रामसेवक आणि सरपंच यांनी प्रत्यक्ष मिरवणूक मार्गाची पाहणी करून, रस्त्यावर अडथळा ठरणारे साहित्य काढण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात तसेच मिरवणूक मार्गाची स्वच्छता करून तो मार्ग सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असेल.
______________________
"महामानवांचा उत्सव हा आपल्या सर्वांचा अभिमान आहे. या उत्सवात शिस्त आणि स्वच्छता राखणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करून मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात."
— नितीन कुमार पाटील (ठाणेदार, जळगाव जामोद)
_____________________
पोलीस प्रशासन तालुक्यात शांतता कमिटीच्या बैठकाही घेत असुन. मिरवणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.जळगाव जामोद तालुक्यातील जनतेने या आवाहनाला प्रतिसाद देऊन आदर्श जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

