जळगाव जामोद(प्रतिनिधी):
ज्यांनी विषमतेच्या अंधारात ज्ञानाची मशाल पेटवून बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला, त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जळगाव जामोद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांना उजाळा दिला.यावेळी राजकीय मतभेद बाजूला सारून महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष क्रांतीसूर्याला नमन करण्यासाठी एकाच व्यासपीठावर आले होते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ आणि जिल्हा सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेंजित पाटील यांनी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर आणि शहराध्यक्ष अमर पाचपोर यांनी महात्मा फुलेंच्या स्त्री-शिक्षण कार्याचा गौरव केला.या सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, नगरसेवक इरफान शेट्टी, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे, अविनाश उमरकर, डॉ. संदीप वाकेकर, शिवसेना शहर प्रमुख रमेश ताडे, श्रीकृष्ण केदार, अर्जुन घोलप, एड. संदीप मानकर, ओ.पी. तायडे, विलास भारसाकडे, अनिल इंगळे आणि एड. रतन इंगळे यांसह महाविकास आघाडीचे असंख्य निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते."महात्मा फुले यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी दिलेला लढा हा आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सत्यशोधक विचारांनीच समाजाची प्रगती शक्य आहे," अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.बाजार समितीचा परिसर 'जय ज्योती जय क्रांती'क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून या जयंती कार्यक्रमाकडे पाहिले गेले.
