जळगाव जामोद(प्रतिनिधी):
दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका, केळी, कांदा, ज्वारी तसेच संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच पंचनामे करताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या वेळी उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, उपजिल्हा संघटक वसंतराव मिरगे, तालुकाप्रमुख संजय धुळे, किसान सेना तालुकाप्रमुख गजानन देशमुख, शेतकरी आंदोलक प्रकाश भिसे, शहर प्रमुख (जळगाव जामोद) संजय भुजबळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाळू पाटील, उपशहर प्रमुख समाधान पाटील, उपशहर प्रमुख राजेंद्र सिंह परिहार, शिवसैनिक अशपाक भाई देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
