डीजे चा धिंगाणा सोडा वाचन संस्कृती जोपासा जळगाव जामोद शांतता सभेत पोलीस प्रशासनाचा नवा फार्मूला..


 डीजे चा धिंगाणा सोडा वाचन संस्कृती जोपासा जळगाव जामोद शांतता सभेत पोलीस प्रशासनाचा नवा फार्मूला..

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

"महापुरुषांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी लढा दिला आहे, त्यामुळे त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. जर कुणी शांततेचा भंग केला किंवा उत्सवाला गालबोट लावले, तर पोलीस प्रशासन कायद्याचा बडगा उगारण्यास मागे-पुढे पाहणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी समाजकंटकांना इशारा दिला.जळगाव जामोद येथे आयोजित शांतता कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.​​व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, नायब तहसीलदार भरत किटे, आणि गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.​जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या भाषणात शिस्तीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की:"माझ्या वर्तणुकीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे.तर मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.वर्गणीचा पैसा डीजे आणि अनावश्यक खर्चात न घालवता तो समाजाच्या प्रगतीसाठी वापरावा.यावेळी ​अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत सतर्क केले.फेसबुक, व्हॉट्सॲपवर येणारी प्रत्येक माहिती खरी नसते. अफवांना बळी पडू नका," असे आवाहन त्यांनी केले. तसेच सोशल मिडीया पासून सुटकेसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाने एक मिशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.'एकच ध्यास, अर्धा तास अभ्यास' हा अभिनव उपक्रम राबवून तरुणांना वाचनाकडे वळवण्याचा संदेश त्यांनी दिला.​या सभेला सचिन देशमुख, देवा दामोदर, डॉ. सतीश शिरेकर, सुनिता हेलोडे, मंजूर खान, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे, व्यापारी संघटनेचे अजय वानखडे, पत्रकार संघटनेचे कैलास देशमुख यांच्यासह पत्रकार बांधव, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरणचे कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, सर्व पोलीस पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​कार्यक्रमाची रूपरेषा व ​प्रास्ताविक ठाणेदार नितीन कुमार पाटील यांनी केले. भारदस्त सुत्रसंचलन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी तर आभार तामगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.जळगाव जामोद पोलीस प्रशासनाने या बैठकीद्वारे एकीकडे प्रेमाचा हात दिला आहे, तर दुसरीकडे कायदा मोडणाऱ्यांना कठोर इशाराही दिला आहे.

Previous Post Next Post