अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एक अत्यंत धाडसी कारवाई करत आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि वाहनांसह एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दिनांक २ मे २०२६ रोजी फिर्यादी अभयसिंह वाघेला हे आपल्या मालकाचे १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओने समृद्धी महामार्गावरून जात होते.किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टापर मार्शल हबजवळ एका बोलेरो आणि इनोव्हा गाडीने त्यांना अडवले. १० ते १२ अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण करून, बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १२ लाख रुपये आणि गाडी हिसकावून नेली होती. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे ही टोळी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लपली असल्याची माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गुप्ततेने अंबाजोगाई गाठले आणि वेढा टाकून ८ सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक केली.पकडण्यात आलेले आरोपी महाराष्ट्र (बीड, रायगड), उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर अशा विविध राज्यांतील आहेत. यामध्ये हिम्मतसिंग जुनी, मुन्ना वर्मा, मनोज कुटे, मो. रशिद गुज्जर, सचिन शिर्के, हरीश तोमर, अरुणकुमार यादव आणि जसपालसिंग झाला यांचा समावेश आहे.यांच्या ताब्यातून नगदी रोकड १,८०,००० रुपये, १ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत राऊंड,१ इनोव्हा आणि १ बोलेरो गाडी,४ मोबाईल फोन आणि वायफाय डिव्हाईस एकूण किंमत: १२,४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सुनील अंबुलकर सोबत पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. अमोल अंभोरे, गजानन गोरले, मनोज खरडे, चापोहेकॉ. सुरेश भिसे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा. पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषी खंडेराव तांत्रीक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांचे पथकाने केली. सदर कार्यवाहीमध्ये पोनि. शिवाजी बंटेवाड, पोह.दिलीप चंद्रभान गित्ते, पोह.रामचंद्र परशुराम केकाण, पोह. गोविंद व्यंकटी भताने नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे सहकार्य लाभले. या कारवाईमुळे महामार्गावरील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
