अनिल भगत (बुलढाणा):
एकीकडे आधुनिकतेच्या गप्पा मारल्या जात असताना आजही समाजाला बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांनी विळखा घातलेला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत एका १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखून तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे.दिनांक २ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला 'CCTNS' प्रणालीद्वारे एक ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली होती. ग्राम किन्ही पवार येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह ३ मे रोजी लावला जाणार असल्याची माहिती या तक्रारीत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या.बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी तातडीने पथक तयार केले.पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर व त्यांच्या पथकाने किन्ही पवार गावात धाड टाकली. यावेळी १५ वर्षे ६ महिने वयाची मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत लग्नाच्या विधीमध्ये गुंतलेली आढळली. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत हा विवाह तात्काळ थांबवला आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली.
"१८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलगा यांचा विवाह लावणे हा 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६' नुसार गंभीर गुन्हा आहे. असा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
— ब्रम्हा गिरी (पोलीस निरीक्षक, देऊळगाव राजा)
या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर,मपोउपनि विकास पटेल,एएसआय प्रमोद मुळे,कर्मचारी समाधान गिते, रामकिसन गिते, शीतल नांदे आणि चालक विजय दराडे यांचा सहभाग होता.
