प्रशांत भोपळे/हिवरखेड (प्रतिनिधी):
अकोला पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' राबविले जात आहे. या मोहिमेतंर्गत हिवरखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत एका इसमाला गांजा विक्री करताना रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून ४९५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीवर अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) गोपाळ गिलबिले यांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली होती. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी मंगेश मनोहर सोळंके (वय ३८ वर्ष) याने आपल्या राहत्या घरी विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा करून ठेवला असल्याची ती माहिती होती.माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने हिवरखेड पोलिसांनी बेलखेड येथे मंगेश सोळंके याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईवेळी नायब तहसीलदार ढगे, पोलीस कर्मचारी, पंच आणि वजन काट्यावाल्यासह पथकाने तपासणी केली.झडती दरम्यान आरोपी मंगेश सोळंके याच्याकडे ४९५ ग्रॅम गांजा सापडला, ज्याची अंदाजे किंमत ६,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८०/२०२६, कलम ८(क), २०(ब), (ii) NDPS ACT नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड, पोउपनि गोपाळ गिलबिले, पोलीस कर्मचारी प्रमोद चव्हाण, प्रफुल पवार, आकाश गजभार आणि रेखा रघुवंशी यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि गोपाळ गिलबिले करत आहेत. जिल्हयातील अशा अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
