आर सी २४ न्युज नेटवर्क/बुलढाणा:
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी भाषा वापरणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भारतीय जनता पक्षाने आज तीव्र शब्दांत निषेध केला. स्वतःला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक म्हणवून घेणाऱ्या सपकाळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेली अश्लाघ्य टिप्पणी त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी म्हटले आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डॉ. संजय कुटे म्हणाले की,टीका करताना सपकाळांनी किमान स्वत्वाची उंची आणि भाषेची मर्यादा राखायला हवी होती. राष्ट्रसंतांचे नाव घेणाऱ्या व्यक्तीकडून अशा खालच्या पातळीच्या राजकारणाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही नेहमीच सभ्यता आणि संस्कारांवर आधारित राहिली आहे, मात्र काँग्रेसने सातत्याने वैयक्तिक टीकेची संस्कृती वाढवून लोकशाहीची थट्टा मांडली आहे.पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार पदांवरील व्यक्तींबद्दल वापरलेली भाषा ही केवळ त्यांचा अपमान नसून, ती महाराष्ट्रातील सुजाण जनतेचा अवमान आहे.काँग्रेसच्या या अश्लाघ्य भाषेला जनता कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही डॉ. कुटे यांनी दिला आहे. मतभेद असू शकतात, परंतु टीका करताना पाळायची भाषेची मर्यादा काँग्रेसला विसर पडला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.आमदार डॉ. संजय कुटे यांनी भाजपाच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला असून, राजकीय वर्तुळात या विषयावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एकीकडे विकासकामांवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या अशा वैयक्तिक टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, यावर आता सपकाळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
