अनिल भगत/बुलढाणा विशेष (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव राजा रोडवर एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. जालना जिल्ह्याच्या सीमेवर सिनेस्टाईल पाठलाग करून ५ अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला आहे.दिनांक १ मे २०२६ रोजी फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (रा. शंकरनगर, नांदेड) यांना आरोपींनी 'रत्न व सुलेमानी हकीक' या खड्यांचा व्हिडिओ दाखवून खरेदीसाठी बोलावले होते. चिखली येथील राजवाडा परिसरात फिर्यादी आले असता, आरोपी निलेश नरेश भोसले आणि त्याच्या इतर ४ साथीदारांनी संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २० हजार रुपये, असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी हे साकेगाव येथून जालना जिल्ह्याकडे पळून जात आहेत. या माहितीवरून पोलिसांनी जालना जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी केली.आरोपींनी पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तब्बल ३ किलोमीटर शेतात धावून त्यांचा पाठलाग केला व आरोपी १. निलेश नरेश भोसले (रा. साकेगाव)२. जंकीचंद विरोधभाई पवार (रा. साकेगाव)३. आदित्य शेनु भोसले (रा. साकेगाव)४. राज अभिमान पवार (रा. साकेगाव)५. भाऊराजा पवार (रा. साकेगाव) या पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या व आरोपींकडून खालील वस्तू जप्त केल्या आहेत:त्यामध्ये २ सोन्याच्या अंगठ्या (१४ ग्रॅम), सोन्याचे कानातील कुंडल (५ ग्रॅम).४०० ग्रॅम चांदीचे कडे, २ चांदीचे ब्रासलेट, चांदीची अंगठी, राखी, साखळी व इतर वस्तू.रोख रक्कम: ११,००० रुपये नगदी.असा एकूण ४,८०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, अंढेरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
