भारतीय इतिहासात आपल्या न्यायप्रिय, लोकहितवादी आणि धर्मपरायण कार्याने अमिट ठसा उमटविणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन म्हणजे समाजसेवा, स्त्रीशक्ती, न्याय आणि लोककल्याण यांचे जिवंत उदाहरण होय. म्हणूनच भारतातील प्रत्येक घराघरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी व्हावी, ही आजच्या काळाची गरज आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक कार्ये केली. त्यांनी देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पाणपोया बांधून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असो किंवा जनतेसाठी न्यायव्यवस्था मजबूत करण्याचे कार्य असो, त्यांनी प्रत्येक काम लोककल्याणाच्या भावनेतून केले.
आजच्या पिढीसमोर त्यांचे विचार आणि कार्य पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जयंतीनिमित्त गावोगावी व्याख्याने, प्रभातफेरी, रक्तदान शिबिर, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन झाले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवेचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल...
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रियांसाठी आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे दार उघडले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती व सामाजिक एकात्मता अधिक मजबूत झाली. त्यामुळे त्यांची जयंती केवळ एक उत्सव नसून प्रेरणेचा आणि सामाजिक जागृतीचा दिवस म्हणून साजरी झाली पाहिजे.
आज संपूर्ण देशात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव वाढत आहे. त्यांच्या विचारांचे संवर्धन करून नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आणि प्रत्येक समाजघटकात उत्साहाने साजरी करूया.
“लोककल्याण हाच खरा धर्म” हा संदेश देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन!
सौ गीता शिवदास सोनोने...
