धारणीत 5.156 किलो गांजासह आरोपी जेरबंद..धारणी पोलिसांची धडक कारवाई; 99 हजारांच्या गांजासह आरोपी ताब्यात...दुबई मोहल्ला परिसरात छापा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल...


 धारणीत 5.156 किलो गांजासह आरोपी जेरबंद..धारणी पोलिसांची धडक कारवाई; 99 हजारांच्या गांजासह आरोपी ताब्यात...दुबई मोहल्ला परिसरात छापा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या अवैध अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत धारणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 5.156 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 99 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, धारणी शहरातील दुबई मोहल्ला परिसरात एका व्यक्तीकडे अवैधरित्या गांजाचा साठा करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.झडतीदरम्यान आरोपीच्या घरामध्ये ठेवलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये गांजासदृश वाळलेली पाने, फुले व बिया आढळून आल्या. तपासणीअंती तो पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण 5 किलो 156 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 99 हजार 420 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएसफ% कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत धारणी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.

___________________________________

"धारणी पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती पोलिसांना द्यावी. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून भविष्यातही अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील."

— अवतारसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक, धारणी पोलीस स्टेशन.

Previous Post Next Post