जळगाव जामोद(प्रतिनिधी):
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिनांक ११ जून २०२६ रोजी जळगाव जामोद वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.या बैठकीत सन २०२६-२७ या आगामी कालखंडासाठी वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ विधीज्ञ एड. रुपेश पी. विश्वेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.वकील संघाच्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सदस्यांनी एकमतानेअध्यक्षपदी अँड रुपेश पी. विश्वेकर,उपाध्यक्षपदी अँड. एस. व्ही. खुपसे तर सचिवपदी अँड.अभिमन्यू बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेचे अध्यक्षपद ज्येष्ठ विधीज्ञ एड. माहेश्वरी यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ अँड.खिरोडकर आणि अँड.जी. एस. गावंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजनात अँड.रवी उंबरकर, अँड मुकुंदा टोंगलकर आणि अँड विनोद मुंडोकार यांनी मोलाची भूमिका बजावली.या निवडीच्या ठरावासाठी अँड आर. एस. काकडे यांनी अनुमोदक म्हणून कार्यभार सांभाळला, तर अँड डी. बी. इंगळे यांनी सूचक म्हणून काम पाहिले.या नवनिर्वाचित अध्यक्षांचे आणि पदाधिकाऱ्यांचे याप्रसंगी ज्येष्ठ वकिलांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीला जळगाव जामोद न्यायालयातील सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकील संघाच्या आगामी वाटचालीसाठी ही कार्यकारिणी कटीबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नवनिर्वाचित अध्यक्ष अँड रुपेश विश्वेकर यांनी सर्वांचे आभार मानत, वकील संघाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि बार असोसिएशनच्या बळकटीकरणासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
