जळगाव जामोद(प्रतिनिधी):
दहावी व बारावीच्या निकालानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले व शैक्षणिक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याच्या समस्येकडे पालक संघटनेने लक्ष वेधले. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने तत्काळ दखल घेत विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखल्यांचे वितरण सुरू केले आहे.पालक संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रवेश प्रक्रियेसाठी विविध शैक्षणिक कागदपत्रांची आवश्यकता असताना अनेक विद्यार्थ्यांनी दाखल्यांसाठी अर्ज करूनही १५ ते २० दिवस उलटून गेले तरी त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून प्रलंबित दाखले तातडीने वितरित करण्याची मागणी पालक संघटनेने केली होती. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार पवन पाटील आणि नायब तहसीलदार कीटे यांनी तत्काळ हालचाल करत विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यास सुरुवात केली.यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी, “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही,” असे स्पष्ट करत दाखल्यांच्या वितरणात झालेल्या विलंबामागे तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे सांगितले. तसेच नायब तहसीलदार कीटे यांनी वरिष्ठ स्तरावर दूरध्वनीद्वारे चर्चा करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.निवेदन सादर करताना पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे, उपाध्यक्ष अर्षद इकबाल खान, सचिव अनिल भगत, कोशाध्यक्ष अजय पलन, संघटक श्याम पाटील, विशाल भगत यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
