वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार; प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश...


 वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार; प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

दि. १ जून २०२६ रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील केळी, संत्रा तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, घटनेनंतर आमदार डॉ. संजय कुटे यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.आज, दि. ६ जून रोजी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनामे व उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.यावेळी विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भातही संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या आठवडाभरात नुकसान अहवाल तयार करून तो तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, विमाधारक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती व तक्रार संबंधित यंत्रणेकडे त्वरित नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, नुकसानग्रस्तांना न्याय व शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी दिली.

Previous Post Next Post