बातमी प्रकाशित केल्याच्या रागातून पत्रकार प्रवीण मुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला.. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर पत्रकार संघटनांचा आंदोलनाचा इशारा
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
दहेंद्री येथील तीन व्यक्तींनी दैनिक चालू वार्ताचे पत्रकार प्रवीण मुंडे यांच्यावर कोटमी फाट्याजवळ जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. "आमची बातमी का प्रकाशित केली?" या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी पत्रकार मुंडे यांना अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या हल्ल्यातून पत्रकार प्रवीण मुंडे यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. घटनास्थळी आलेल्या एका पिकअप वाहनाला लटकून तेथून निसटल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. अन्यथा या घटनेत मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा परिसरात होत आहे.घटनेनंतर पत्रकार मुंडे यांनी काटकुंभ पोलीस चौकीत तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस विभागानेही प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. समाजातील विविध प्रश्न, अन्याय व गैरप्रकार जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. अशा परिस्थितीत केवळ बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकारावर जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत निंदनीय आणि गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.या प्रकरणातील तीनही आरोपींवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात येत आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. दोषींना कठोर शिक्षा झाल्यासच पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबतील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होईल, अशी भावना पत्रकार व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
