सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट शहरात सध्या रासायनिक खतांचा विशेषतः युरियाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्याने पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या युरिया खतासाठी बळीराजाची मोठी फरफट होतांना दिसत आहे.शहरातील प्रमुख कृषी सेवा केंद्रांसमोर दिवसा ढवळ्या नव्हे तर चक्क पहाटे पाच वाजेपासूनच शेतकरी गाशा गुंडाळून रांगा लावत आहेत.यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या 'लाडक्या बहिणी' म्हणजेच महिला शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक या कडक उन्हात तासनतास ताटकळत उभे आहे.पहाटे सहा वाजेपासूनच रांगा,महिला व वृद्धांचे हाल अकोटमधील कृषी केंद्रांचे दरवाजे उघडण्यापूर्वीच हजारो शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.सध्या उन्हाचा पारा सुमारे ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास असतानाही खत संपून जाईल या भीतीने शेतकरी अन्न-पाणी सोडून रांगेत उभे आहेत.शेतातील कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला ('लाडक्या बहिणी') आणि वयस्कर वृद्ध शेतकरीही या रांगेत टोकन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.केवळ 2 डीएपी आणि 2 युरियाचे पोते वाटप करण्यात येत आहे.साठा अत्यंत मर्यादित असल्याने कृषी केंद्र चालकांकडून आधारकार्ड आणि टोकन पद्धतीचा वापर केला जात आहे.काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांना पाचारण करावे लागले असून पोलीस बंदोबस्तात खत विक्री सुरू आहे.तालुक्यात खताचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
--प्रतिक्रिया--
आज प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळावे या दृष्टिकोनातून टोकन पद्धतीने वाटप करण्यात आले.उद्या देखील खताच साठा उपलब्ध होणार आहे.म्हणून शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे
गौरी गोफणे
कृषी अधिकारी अकोट
--प्रतिक्रिया--
सकाळी सहा वाजता पासून रांगेत उभा होतो पण एका व्यक्तीला 2 पोते वाटप होत असल्यामुळे मला आल्या पावली घरी परतण्याची वेळ आली
जगन्नाथ मार्के
शेतकरी बोर्डी.
