संग्रामपूर तालुका प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, संग्रामपूर मंडळाच्या वतीने सहकार विद्या मंदिर, वरवट बकाल येथे भव्य योग संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत नागरिकांसह सामूहिक योगाभ्यास केला. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, योगप्रेमी तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, योग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची साधना नसून मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीचा आधार आहे. दैनंदिन जीवनातील तणाव कमी करून निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सामूहिक योगाभ्यासाद्वारे उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. यावेळी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत "योग हेच आरोग्य, योग हाच जीवनाचा मंत्र" या संकल्पनेचा प्रचार करण्यात आला.कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. निरोगी भारत आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे संग्रामपूर तालुक्यात आरोग्य, जनजागृती आणि सामूहिक सहभागाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
