राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी :
मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होऊन सामाजिक सेवेचे व्रत जपणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव वानखडे यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मेळघाट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आमदार सईताई प्रकाश डाहाके, माजी न्यायाधीश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, शासकीय अधिकारी पुंडलिक गोसावी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शारदाताई भुयार यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी कृष्णराव वानखडे यांचा आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र, मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृष्णराव वानखडे यांनी अनेक वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि जनकल्याणाच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे ते समाजात आदराचे स्थान मिळवून आहेत.या राज्यस्तरीय सन्मानामुळे मेळघाटच्या सामाजिक कार्याची राज्यभर दखल घेतली गेली असून, वानखडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध संस्था, संघटना व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
