बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मलकापूर परिसरातील महावितरणचा (MSEB) कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला असून, यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान होत आहे. या परिसरामध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असून, जिथे १०० क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर आवश्यक आहे, तिथे केवळ ६३ क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून ओव्हरलोडिंग केले जात आहे. तसेच, जामोद-सुनेगाव परिसरातील शेतकऱ्यांना शासनाने कबूल केल्याप्रमाणे दिवसा किमान अर्धा वेळ वीज मिळणे अपेक्षित असताना ती मिळत नसल्याने त्यांच्यावर शेती कशी करायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.याहूनही गंभीर बाब म्हणजे, केवळ मलकापूर सबडिव्हिजनमध्ये तब्बल २०० किलोमीटरच्या वीज तारा चोरीला गेल्या असून, हा एक प्रचंड मोठा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे.शेतकऱ्यांच्या मोटारी आणि केबल देखील चोरीला जात आहेत. या चोरांना जेरबंद करून त्यांच्यावर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची आमची प्रशासनाकडे आणि गृह विभागाकडे मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष ईरफान खान, एजाज देशमुख,आशिष वायझोड़े,दत्ता डिवरे, सिद्धार्थ हेलोड़े यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
