खामगाव शेतकरी विकास मंचाचा कर्जमाफीसाठी एल्गार मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन; निकष बदलून १०० टक्के सरसकट कर्जमाफीची मागणी...


 खामगाव शेतकरी विकास मंचाचा कर्जमाफीसाठी एल्गार मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन; निकष बदलून १०० टक्के सरसकट कर्जमाफीची मागणी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेतकरी विकास मंच शाखा पिंपळगाव राजा यांच्या वतीने खामगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" मधील निकष बदलून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १०० टक्के सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व निकष लागू करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने दिलेले आश्वासन पूर्णत्वास जाणार नसल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये व्यक्त होत आहे.राज्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दिलासा देणे आवश्यक आहे. प्रत्येक ७/१२ धारक शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊन आर्थिक स्थैर्य प्रदान करावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शेतकरी विकास मंचाचे शाखाध्यक्ष भगवान पांडुरंग बोबटकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल महाले, मो. जुबेर, संजय वासुदेव ढगे, शेख इस्माईल, अशोक गणपत इंगळे, पांडुरंग नामदेव शेजोळ, बळीराम शंकर बोमटकार, गजानन नामदेव जुमडे, रमेश शंकर करांगडे, प्रशांत वसंता सातव, मो. रशीद, गुलाम मुस्तफा, मोतीराम सातव, संजय जगदेव सातव व श्यामल अशोकराव गायगोळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने शेतकरी हिताचा विचार करून कर्जमाफीच्या निकषांमध्ये तातडीने बदल करावेत आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Previous Post Next Post