समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन; कारवाईची मागणी...


 समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन; कारवाईची मागणी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस सय्यद शफी यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले. हे निवेदन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविण्यात आले.निवेदनात नाझिया इलाही यांनी इस्लाम धर्म, अल्लाह तआला तसेच हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याबाबत कथितरित्या केलेल्या वादग्रस्त व धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांबाबत तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.समाजवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी सांगितले की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा आणि त्याचा सन्मान राखण्याचा अधिकार देते. कोणत्याही धर्म, धार्मिक प्रतीक किंवा पूजनीय व्यक्तिमत्त्वांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यास समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला की, या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास समाजवादी पक्षाला लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने आंदोलन छेडावे लागेल.यावेळी समाजवादी पक्षाचे बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, शेख नदिम, मुस्ताक जमदार, आरिफ डीजे, समीमभाई, शारीरिक अली, शेख राजू, शेख मुख्तार, तोसीफ बिल्डर, मिर्झा तहसीलम यांच्यासह समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदन सादर केल्यानंतर उपस्थितांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

Previous Post Next Post