जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात दिनांक १ जून २०२६ रोजी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून, त्वरित पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील केळी व मोसंबी, संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव, या दुहेरी संकटाने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत असताना, निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकरी हतबल झाला आहे.शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक ३ जून रोजी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित स्थळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी."
तसेच, जर १५ दिवसांच्या आत प्रशासनाने हे पंचनामे पूर्ण करून मदत दिली नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदन देतेवेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे, संतोष डब्बे, कैलास मिसाळ, पांडुरंग वानखडे, कैलाससिंह राजपुत यांचेसह स्थानिक पदाधिकारी व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
__________________________
आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ देण्यात यावी. आम्ही १५ दिवसांची मुदत दिली असून, जर या काळात पंचनामे होऊन मदत मिळाली नाही, तर शेतकरी राजाच्या न्यायासाठी शिवसेनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील."
— गजानन नामदेवराव वाघ,
जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा.
________________________
