जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोद शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या समर्थनार्थ सध्या सोशल मीडियावर एक भावनिक मोहीम सुरू झाली आहे.आपल्या कर्तव्यनिष्ठेसाठी आणि संवेदनशीलतेसाठी ओळखले जाणारे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खंत व्यक्त होत आहे.जळगाव जामोद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून नितीन पाटील यांनी शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले होते.
त्यांच्या कार्यकाळातील काही प्रमुख कामगिरी:
त्यांनी काळी हळद, नागमणी यांसारख्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकारांवर पूर्णतः बंदी आणली.शहरातील गरीब, निराधार आणि दीन-दुबळ्यांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.शहरात शिस्त लावण्याचे काम करत असतानाच त्यांनी गुन्हेगारीवरही कडक वचक निर्माण केला होता.जळगांव जामोद चे ठाणेदार नितीन पाटील सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका मुलीच्या कथित मृत्यू प्रकरणात, संबंधित पिता-पुत्राने (बापूराव आणि अजय कळमेकर) खुनाची खोटी कबुली दिली होती. यावर पोलीस तपास करत असतानाच, ती तरुणी 'मी जिवंत आहे' असे म्हणत समोर आली. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि वरिष्ठांनी ठाणेदार नितीन पाटील यांचा जळगाव जामोद ठाण्याचा पदभार काढून त्यांची जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये बदली केली.कारागृहातून सुटल्यानंतर संबंधित पिता-पुत्रांनी स्पष्ट केले आहे की, पोलीस कोठडीत त्यांना चांगली वागणूक मिळाली होती आणि पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता. या स्पष्टीकरणामुळे पोलीस प्रशासनावर होणाऱ्या टीकेची धार काहीशी कमी झाली आहे. मात्र, अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदली झाल्यामुळे जळगाव जामोदची जनता मात्र दुखावली आहे."अशा संवेदनशील आणि धडाडीच्या अधिकाऱ्याला जळगाव जामोद मुकले आहे," अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ 'आम्ही आपल्या सोबत आहोत' (We are with you) अशा आशयाचे संदेश आणि पोस्ट्स व्हायरल होत आहेत. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहून नागरिकांनी त्यांच्या कामाला दिलेली ही एक प्रकारची पोचपावतीच मानली जात आहे.
