बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पोस्टर आंदोलन करण्यात आले. या पोस्टरद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या अशा घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी सांगितले की, नीट परीक्षेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
