जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोद शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या जागेचा काही भाग उपजिल्हा रुग्णालयासाठी देण्याच्या निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी नगर परिषदेतील सत्ताधारी गटाने शहरातील एकमेव मुलींच्या शाळेची सुमारे 1200 चौ.मी. जागा उपजिल्हा रुग्णालयाला देण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक व बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला.काँग्रेस पक्षाने या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. दि. 26 मे 2026 रोजी नगर परिषद जळगाव जामोदच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या शालेय परिसरातील 1200 चौ.मी. जागा उपजिल्हा रुग्णालयाला देण्याचा ठराव मंजूर केला. या विद्यालयात शहरातील 270 हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याने या निर्णयामुळे त्यांच्या शैक्षणिक सुविधांवर परिणाम होणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.या ठरावाला काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहात तीव्र विरोध केला होता. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.काँग्रेसच्या नगरसेवकांनी यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच शिक्षण विभागाचे उपसंचालक, अमरावती यांच्याकडे तक्रारी दाखल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.नगर परिषद जळगाव जामोदने हा ठराव तातडीने रद्द न केल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जळगाव मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ.स्वातीताई संदीप वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, तालुकाध्यक्ष अॅड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष अमर पाचपोर, नगरसेविका मीनाताई सातव,संगीताताई भारसाकळे, समिना शाकीर खान, फरजाना बी. सय्यद अफरोज,वैशाली तायडे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. संदीप उगले, रतन नाईक, माजी नगरसेवक अर्जुन घोलप, कार्याध्यक्ष नासीर भाई, सै. तोफीक, डॉ. संदीप वाकेकर, डॉ. शाकीर खान, डॉ. प्रशांत राजपूत, गजानन सूर्यवंशी, जुनेद शेख, हुसेन राही, निलेश तायडे, अयाज भाई, अजहर देशमुख, सै. अफरोज, रतन इंगळे, योगेश बाजोड, सुनील भिवटे, बाबू जमदार, अजय राजपूत, विलास भारसाकळे, विजय गुरव आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
