जळगाव जामोद(प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या 'मिशन परिवर्तन' मोहिमेला बळ देत, जळगाव जामोद पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. जळगाव जामोद-बऱ्हाणपूर रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागे सुरू असलेला जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त करून पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ८० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास जळगाव जामोद-बऱ्हाणपूर रोडवरील 'स्वोंद' धाब्याच्या पाठीमागे असलेल्या टिनशेडमध्ये काही इसम 'एक्का-बादशाह' नावाचा जुगार खेळत होते. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचासमक्ष अचानक धाड टाकली असता, तिथे जुगार खेळताना ५ आरोपी रंगेहात मिळून आले.त्यामध्ये शेख करिम शेख अमीर (वय २८), दिपक नारायण हिस्सल (वय ३१), वसीम खान मेहमुद खान (वय १९), शेख गफुर शेख अमीर (वय २७) आणि जावेद खान गुलाब खान (वय ३२). यांना अटक करण्यात आली तसेच इतर ६ ते ७ अज्ञात इसम फरार आहेत.आरोपींच्या अंगझडतीतून आणि जुगार खेळत असलेल्या ठिकाणाहून रोख ८०,६८० रुपये आणि ५२ ताश पत्ते (किंमत ५० रुपये) असा एकूण ८०,७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलीस उपनिरीक्षक विनोद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, मलकापूर उपविभागीय अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल यांचेसह पीएसआय गणेश कायंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, प्रफुल्ल डब्बे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील झुंझारकर यांच्या पथकाने केली. आरोपींना सध्या कायदेशीर नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.जळगाव जामोद पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध धंद्यांविरुद्ध ही मोहीम तीव्र राहील, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
