जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोद शहरात फोफावलेल्या अवैध गुटखा तस्करीने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. मध्य प्रदेशातून होणारी ही गुटखा तस्करी आणि शहरात राजरोसपणे सुरू असलेली विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत, शिवसेना (उबाठा) बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे बुरहानपूर (मध्य प्रदेश) मार्गे दररोज लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जळगाव जामोदमध्ये दाखल होत आहे. डोंगराळ रस्ते आणि सीमावर्ती भागाचा फायदा घेत बोलेरो पिकअप वाहनांतून हा साठा आणला जात असून, पुढे दुचाकी व ऑटोद्वारे शहराच्या कानाकोपऱ्यात छुप्या पद्धतीने त्याची विक्री केली जात आहे.आरटीओ चेकपोस्ट आणि पोलिसांचा प्रभावी पहारा नसल्याने तस्करांचे चांगलेच फावले आहे.गुटख्यासोबतच तालुक्यासह शहरातील काही किराणा दुकानांमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असून, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.आतापर्यंत तक्रारी होऊनही संबंधित विभागाकडून तालुक्यात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक उपायुक्त पाटील यांची भेट घेऊन गजानन वाघ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "येत्या १५ दिवसांच्या आत गुटखा माफिया आणि भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास, शिवसेनेच्या वतीने संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा देण्यात आला आहे.
_____________________
"शहरातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या या गुटखा तस्करीला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. १५ दिवसांनंतरही परिस्थिती न सुधारल्यास, शिवसेना रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारेल."
— गजानन वाघ, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा), बुलढाणा.
_____________________
या निवेदनाची प्रत अन्न व औषध प्रशासनाचे मुंबईतील आयुक्त यांनाही पाठवण्यात आली असून, आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
