शेगावमध्ये कामगार विभागाची धाड; ३ बाल-किशोर कामगारांची मुक्तता!दोन आस्थापनांवर कारवाई; मालकांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल...


 शेगावमध्ये कामगार विभागाची धाड; ३ बाल-किशोर कामगारांची मुक्तता!दोन आस्थापनांवर कारवाई; मालकांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :

बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नियंत्रणाखालील कृतीदलाने २८ जुलै २०२६ रोजी शेगाव येथे धाडसत्र राबविले. या कारवाईत दोन आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या एक बालकामगार आणि दोन किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.शेगाव येथील इंडियन मोटर गॅरेज, खामगाव रोड येथे तपासणी केली असता एक बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले.तसेच महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स, खामगाव रोड येथे दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले.कृतीदलाने तिन्ही बाल-किशोर कामगारांची मुक्तता करून संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ सुधारणा २०१६ अंतर्गत बालकामगारांना कामावर ठेवणे हा दंडनीय अपराध आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १४ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाते.बालकामगार या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.कोणत्याही आस्थापनेत बालकामगार काम करत असल्याचे आढळल्यास नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकतात. कोणीही बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.या कारवाईसाठी कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत, अमरावती तसेच सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे, अकोला यांच्या निर्देशानुसार आणि कामगार अधिकारी शैलेश देशमुख, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक दिपाली अडावतकर (शेगाव), योगेश गोटे (मलकापूर), राजेश वनारे (खामगाव), सतीश देशमुख (मेहकर), सतीश हुडेकर (बुलढाणा), कार्यालयीन कर्मचारी सागर शिंगोटे, महिला व बालविकास कार्यालयाचे निलेश चौथनकर तसेच पोलीस कर्मचारी विनोद इंगोले, पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी सहभाग घेतला.

Previous Post Next Post