जळगाव जामोद/प्रतिनिधी..
जळगाव जामोद तालुक्यातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. वडगाव पाटण येथील शेतकरी रामचंद्र अर्जुन वाघ यांच्या शेतातील सफेद मुसळीची प्रथमच थेट कंबोडिया देशात निर्यात करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून २७ जुलै रोजी सफेद मुसळीची ही निर्यात करण्यात आली.रामचंद्र वाघ हे मागील अनेक वर्षांपासून वनौषधी पिकांचे उत्पादन व व्यापार करीत असून,शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या सफेद मुसळीला देशांतर्गत औषधी कंपन्यांकडून मोठी मागणी असली तरी परदेशात थेट निर्यात होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.विशेष म्हणजे, सदर सफेद मुसळी कोणतीही प्रक्रिया न करता मूळ स्वरूपातच कंबोडियाला पाठविण्यात आली आहे. या निर्यातीमुळे जळगाव जामोद परिसरातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत.यावेळी शेतकरी रामचंद्र अर्जुन वाघ यांनी, “या निर्यातीमुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे,”असे सांगत पुढील वर्षी तब्बल २० टन सफेद मुसळी निर्यात करण्याचा मानस व्यक्त केला.या उपक्रमावेळी कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोदचे प्रमुख डॉ. विकास जाधव तसेच उद्यानविद्या तज्ज्ञ शशांक दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या उत्पादनासोबतच निर्यात बाजारपेठेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास डॉ. विकास जाधव यांनी व्यक्त केला.
