प्रशांत भोपळे/हिवरखेड(प्रतिनिधी):
येथील आकांक्षा शिक्षण संस्था संचलित वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भव्य 'बालदिंडी' व पंढरीच्या वारीचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून भक्तिमय वातावरणात पंढरीची वारी साकारली.कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि पालखी पूजनाने झाली. यानंतर शाळेच्या प्रांगणात टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" च्या जयघोषात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या दिंडीत लहान मुलांनी वारकरी, टाळकरी, विठ्ठल, रुक्मिणी आणि संतांच्या हुबेहूब भूमिका साकारल्या. नऊवारी साड्या परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या चिमुकल्या मुलींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सुंदर अभंग, भजने आणि फुगड्या सादर करून संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला होता.आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीची व संस्कारांची ओळख व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका लहाने मॅडम यांनी केले.या सोहळ्याप्रसंगी आकांक्षा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मयूर लहाने व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच या कार्यक्रमास पालक वृंद श्रीकांत परनाटे, विजया कतोरे, अश्विनी जोशी, रेखा काटोले, शुभांगी भिसे, वृषाली मसूरकार, अपर्णा मसूरकार, किरण कवळकार, पूजा कवळकार व रुपाली गुइकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका राजनकार मॅडम, मुस्कान मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. चिमुकल्यांच्या या शिस्तबद्ध आणि भक्तिमय वारीचे हिवरखेड परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
