जळगाव जामोद (प्रतिनिधी);
जळगाव जामोद तालुक्यातील मानेगांव मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज सकाळी आदर्श विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे जतन करणारी एक भव्य मिरवणूक काढली. या दिंडी सोहळ्याने संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते.मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान विद्यार्थ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा होती. मुलांनी धोतर-कुर्ता आणि मुलींनी नऊवारी साड्या व लुगडी नेसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. हातात टाळ-मृदंग, कपाळावर बुक्का आणि खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या गजरात निघालेल्या या बालवारकऱ्यांच्या उत्साहाने ग्रामस्थ भारावून गेले.'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात ही दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत केले आणि बालवारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने या सुंदर सोहळ्याचे आयोजन आदर्श विद्यालय मानेगांव चे मुख्याध्यापक आर. एस. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
