जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, जळगाव जामोद येथे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले स्वेच्छा रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या रक्तदान शिबिराला नागरिक, युवक तसेच विविध क्षेत्रातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वेच्छेने रक्तदान केले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशाला प्रतिसाद देत अनेकांनी समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांना नवजीवन मिळण्यास रक्तदान महत्त्वाची भूमिका बजावते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या शिबिरात नगराध्यक्ष गणेश दांडगे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पांडव, शाकीर खान, परीक्षित ठाकरे, भगतसिंग चव्हाण, अजय वंडाळे, अनिल जयस्वाल, सचिन जोशी, डॉ. नंदू तायडे, नगरसेविक सुनील रघुवंशी,पांडुरंग मिसाळ, वैभव उमरकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. एका रक्तदात्याच्या रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.या समाजोपयोगी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, जळगाव जामोद येथील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विशेष कौतुक करण्यात आले.
