जळगाव जामोदमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;'दामिनी पथक' कधी होणार सक्रिय?संतापलेल्या पालकांनी केली ठाणेदारांकडे मागणी...


 जळगाव जामोदमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;'दामिनी पथक' कधी होणार सक्रिय?संतापलेल्या पालकांनी केली ठाणेदारांकडे मागणी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊन आता काही दिवस उलटले आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. मात्र, जळगाव जामोद शहरात बस स्थानक परिसर आणि शैक्षणिक संस्थांच्या बाहेर टवाळखोर तरुणांकडून मुलींची छेड काढण्याचे, तसेच चिडवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. या छेडछाडीमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांचे 'दामिनी पथक' त्वरित सक्रिय करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.​३० जूनपासून शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातून हजारो मुली शिक्षणासाठी जळगाव जामोद येथे येतात. दुर्दैवाने, बस स्थानक आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोर मुले दुचाकीवरून घोळका करून उभे असतात. अनेकदा विद्यार्थिनींची छेड काढणे, अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त होत आहे.​याबाबत जळगाव जामोद पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. या निष्क्रियतेमुळे सुज्ञ नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे."शाळा-महाविद्यालयांची वेळ लक्षात घेऊन पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे, मात्र दामिनी पथक कुठेच दिसत नाही," अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी व्यक्त केली आहे.​शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले जाते, मात्र सध्याची परिस्थिती या दाव्याच्या नेमकी उलट आहे. त्यामुळे आता जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन बागुल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन 'दामिनी पथक' तातडीने सक्रिय करावे, अशी मागणी होत आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालयांच्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी दामीनी पथक तैनात करावे.शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करून वचक निर्माण करावा. तसेच बस स्थानकावर महिला पोलिसांची नेमणूक करून छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालावा.​विद्यार्थिनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे, यासाठी पोलीस प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post