सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
टीबीमुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी सिंदखेडराजा येथे आयोजित भव्य जनता दरबारात क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सहा क्षयरुग्णांना पोषण आहार किट प्रदान करण्यात आले.क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात उपचाराबरोबरच योग्य पोषणाचे महत्त्व लक्षात घेऊन निक्षय पोषण योजनेअंतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यामुळे रुग्णांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमास माजी आमदार शेषिकांत खेडेकर, युवा नेते योगेश जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत आर. मंडाले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे, ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण सोनुने, प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव राजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय शिपे, डॉ. परमेश्वर चाटे, डॉ. भागवत येऊल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी टीबीमुक्त भारत अभियानाची माहिती देत क्षयरोगाचे वेळेत निदान, नियमित उपचार आणि पोषणयुक्त आहार यांचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले.जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू असून, आरोग्यविषयक उपक्रमांनाही विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
